येत्या २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. देशभरात या कार्यक्रमाचा एवढा उत्साह आहे की, उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना विनंती केली आहे की, त्यांच्या मुलाचा किंवा घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याचा जन्म २२ जानेवारीलाच व्हायला हवा.
दरम्यान, गर्भवती महिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्रसूतीची तारीख २२ जानेवारीच्या आधी असो किंवा नंतर पण त्यांच्या मुलाचा जन्म शुभ दिवशी झाला पाहिजे. अर्थात राम मंदिराची पायाभरणी ज्या दिवशी होणार आहे त्याच दिवशी बाळाचा जन्म व्हायला हवी, अशी इच्छा होणाऱ्या बाळाच्या आईने व्यक्त केली. GSVM मेडिकल कॉलेजच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या अध्यक्षा डॉ. सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, प्रसूती कक्षात १४ ते १५ प्रसूती होत असतात. मात्र यावेळी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाचा जन्म २२ जानेवारीलाच व्हावा, अशी विनंती केली आहे.
२२ तारखेला ३० ऑपरेशन्सची व्यवस्था तसेच ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यांच्याबद्दल काहीही सांगता येणार नाही, पण ज्यांना ऑपरेशन करायचे आहे, त्यांची तारीख मागे पुढे होऊ शकते, असे अनेकांना सांगण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी ३० ऑपरेशन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणपणे एका दिवसात फक्त १४ ते १५ ऑपरेशन्स होतात, असेही डॉ. सीमा द्विवेदी यांनी सांगितले.
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. राम मंदिरात मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद अशी असेल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त फक्त ८४ सेकंदांचा असणार आहे.