ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 5 - बंगळुरुमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणीचा विनयभंग आणि चोरी केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चार जणांना अटक करण्यात आली असून आरोपी हे उत्तर-पूर्व उपनगरच्या कम्मानहल्ली परिसरातील आहेत. याच परिसरात रविवारी पहाटे 2 वाजून 41 मिनिटांनी पीडित तरूणीसोबत छेडछाड करण्यात आली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे 20 ते 23 वयोगटातील आहेत. बुधवारी चौकशीनंतर चौघांना अटक करण्यात आली.
(VIDEO : बंगळुरु छेडछाड प्रकरण - सीसीटीव्हीत कैद झालं नीच कृत्य)
(VIDEO : बंगळुरु छेडछाड घटनेवरुन अक्षय कुमारचा संताप अनावर)
31 डिसेंबरच्या रात्री पीडित तरुणी रिक्षामधून उतरुन आपल्या घराच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. रिक्षाचं भाडं देऊन तरुणी जात असतानाच एक दुचाकी तिच्या बाजून जाते. दोन तरुण त्या दुचाकीवरुन पुन्हा मागे येतात आणि तिचा रस्ता अडवतात. यामधील एक तरुण खाली उतरतो आणि तरुणीच्या दिशेने जातो. हा तरुण तिला बळजबरीने दुचाकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. दोघे तरुण मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ती स्वतःला सोडवण्याचा पुर्ण प्रयत्न करते. अखेर तरुणीला रस्त्यावर ढकलून आणि तिची बॅग घेवून आरोपी पळून जातात.