ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या चार भारतीय युवकांना सिरीयामध्ये अटक करण्यात आली असून, सिरीयातील दामास्कस शहरातून या युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भारताच्या तीन दिवसाच्या दौ-यावर आलेले सिरीयाचे उपपंतप्रधान वालिद अल मुआलेम यांनी ही माहिती दिली. भारतीय तपास यंत्रणांकडे या युवकांबद्दलची माहिती मागितली आहे. त्यांना कधी अटक केली ते मुलालेम यांनी सांगितले नाही. या युवकांनी जॉर्डनमार्गे सिरीयामध्ये प्रवेश केला होता.
या युवकांची नावे, ते कुठल्या राज्यातील आहेत तसेच त्यांना कधी अटक केली याबद्दल मुआलेम यांनी कोणीतीही माहिती दिली नाही. भारतीय युवकांनी इसिसच्या प्रभावाखाली येऊ नये यासाठी भारतीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या तीन युवकांना भारतीय तपास यंत्रणांनी विमानतळावरुन अटक केली होती.