इंदोर : कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेशातही राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पार्टीच्या नेत्यांमध्ये मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारवरुन वादावादी सुरु आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपा जर कमलानाथ सरकारला कर्नाटक सरकारसारखे असल्याचे समजत असेल, तर ती त्यांची चूक आहे. त्यातच इंदोरचे खासदार नामदेवदास त्यागी उर्फ कम्प्युटर बाबा यांनी भाजपाचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.
कम्प्युटर बाबा म्हणाले, "भाजपाचे चार आमदार माझ्या संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यास त्यांना सर्वांसमोर आणले जाईल. ज्यावेळी मुख्यमंत्री कमलनाथ मला सांगतील, त्यावेळी मी त्यांना सर्वांसमोर घेऊन येईन. तसेच, ते सरकारमध्ये सहभागी होणार आहेत."
दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल आघाडीचे कुमारस्वामी सरकार पाडल्यानंतर 24 तासांच्या आतच भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेत्यांनी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडण्याची भाषा सुरू करताच, तसे करूनच दाखवा, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बुधवारी दिले. एवढेच नव्हे, तर विधानसभेत एका सरकारी विधेयकावर भाजपाच्या दोन आमदारांनी सरकारच्या म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने मतदान करून, भाजपालाच जोरदार दणका दिला आहे.