कर्नाटकमधील म्हैसूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येते एका घरामध्ये कुटुंबातील चार सदस्य मृतावस्थेत सापडले. मृतांमध्ये मेकॅनिकल इंजिनियर आणि व्यावसायिक चेतन, त्यांची पत्नी रुपाली, त्यांचा मुलगा कुशल आणि चेतन यांची आई प्रियंवदा यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार चेतन याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना विष देऊन ठार मारल्यानंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवलं असावं, असा संशय पोलिसांना आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र पोलिसांना समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन याचा मृतदेह फासाला लटकलेला होता. तर त्याचं डोकं प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं होतं. चेतन यांचा मुलगा कुशल याला गळा आवळून मारण्यात आलेलं होतं. तसेच त्याचे पाय बांधलेले होते. चेतन याची आई प्रियंवदा हिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला होता. तर त्याची पत्नी रूपाली ही सुद्धा मृतावस्थेत सापडली.
पोलीस आयुक्त सीमान लाटकर यांनी सांगितले की, या घटनेची माहिती आम्हाला सोमवारी सकाळी मिळाली. मृत चेतन याच्या मेहुण्याने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. चेतन याने हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अमेरिकेत राहत असलेला भाऊ भरत याला फोन केला होता. त्याने नंतर ही माहिती चेतनच्या सासरच्या व्यक्तींना दिली होती.
चेतन हा मूळचा हासन जिल्ह्यातील गोरुर गावातील रहिवासी होता. पेशाने इंजिनियर असलेल्या चेतन याने दुबईमध्ये अनेक वर्षांपर्यंत काम केलं होतं. नंतर २०१९ मध्ये तो भारतात परत आला होता. भारताल आल्यानंतर त्याने एक जॉब कन्सल्टन्सी सुरू केली होती. त्यामधून भारतीय लोकांना दुबईत नोकरी दिली जात होती.