नवी दिल्ली : तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा नागपूरचा गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला यंदाच्या ‘भारत पुरस्कार’ या सर्वोच्च राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येणार आहे. तसेच अन्य २४ बालकांची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात कोथळी (जळगाव) येथील नीलेश भिल्ल, सिंदी रेल्वे (वर्धा) येथील वैभव रामेश्वर घंगारे आणि वाळकेश्वर (मुंबई) येथील मोहित दळवी या महाराष्ट्रातील बालकांचाही समावेश आहे.भारतीय बाल कल्याण परिषदेने (आयसीसीडब्ल्यू) सोमवारी नवी दिल्ली येथे २०१५ या वर्षासाठी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी तीन बालिकांसह एकूण २५ साहसी बालकांच्या नावांची घोषणा केली. त्यापैकी गौरव सहस्रबुद्धे आणि उत्तर प्रदेशचा १३ वर्षीय शिवांश सिंग या दोघांना हा पुरस्कार मरणोपरांत बहाल केला जाणार आहे.नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मित्रांना वाचविताना गौरवचा स्वत:चा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.आमच्या दोन मुलांमध्ये धाकटा असलेला गौरव हा शूर व साहसी होता. त्याला पोहता येत नव्हते. तरीदेखील आपल्या मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात त्याने तलावात उडी घेतली. एकएक करून सर्व मित्रांना तलावातून बाहेर काढले. त्यात तो दमला आणि तलावातून बाहेर पडण्याआधीच बुडाला. त्याला कबड्डी खेळायला आवडे. मोठा होऊन अभियंता बनायची त्याची इच्छा होती,’ असे त्याचे वडील कवडुजी सहस्रबुद्धे यांनी अश्रुपूर्ण नयनांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)गौरव सहस्रबुद्धे (नागपूर)नागपूर शहरातील टाकळी सीम येथील गौरव सहस्रबुद्धे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांचा प्राण वाचविला. त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ला आपल्या चार मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहिले. जीवाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच तो बुडाला.-----निलेश भिल्ल (जळगाव)- ३० आॅगस्ट २०१४ रोजी कोथळी परिसरात पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या भागवत ओगले (११, रा. बुलढाणा) याचे निलेश रेवाराम भिल्ल याने प्राण वाचविले. निलेश कोथळी (ता. मुक्ताईनगर ) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे.——————-वैभव घंगारे (वर्धा)- वैभव रामेश्वर घंगारे हा १२ वर्षीय विद्यार्थी वर्ध्याच्या नेहरू विद्यालय सिंदी (रेल्वे) येथे शिकत असून २६ जुलै २०१४ रोजी नंदा नदीला आलेल्या पुरात सुहास पांडुरंग बोरकर (६) हा वाहत गेला. तो पुलाच्या पाईपमध्ये अडकला असता वैभवने आपल्या जीवाची तमा न बाळगता पुराच्या पाण्यात शिरून सुहासला सहीसलामत बाहेर काढले.———मोहित दळवी (मुंबई) -बारा वर्षांच्या मोहित दळवीने दिवा येथे राहणाऱ्या नऊ वर्षांच्या कृष्णा पाष्टे हिचे प्राण वाचविले. परीक्षा संपवून उन्हाळ््याच्या सुट्टीत मामाच्या घरी राहायला आलेली नऊ वर्षांची कृष्णा वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती गाळात रुतली. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी तिची सुरु असलेली धडपड पाहून मोहित दळवीने पाण्यात उडी घेतली आणि कृष्णाचे प्राण वाचविले.या सर्व बालकांना २४ जानेवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तसेच या पुरस्कार विजेत्या बालकांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्याचीही संधी मिळेल. १५ वर्षांच्या गौरवचा मरणोत्तर पुरस्कार त्याचे माता-पिता स्वीकारतील.
महाराष्ट्राचे चार शूर
By admin | Published: January 19, 2016 4:15 AM