छत्तीसगड : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले आहेत. तर दोन जखमी झाले आहेत.
नक्षली हल्ल्यात शहीद झालेले जवान सीआरपीएफ-168 बटालियनचे होते. सीआरपीएफचे जवान नक्षलवाद्यांच्या शोधार्थ बाहेर पडलेले असताना बासागुडा भागातील मुर्दोण्डा गावाजवळ ही चकमक झाली, अशी माहिती सीआरपीएफचे एएसपी दिव्यांग पटेल यांनी दिली.
याआधी मे महिन्यात छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलांचा भाग असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगचा स्फोट घडवून सशस्त्र दलाचे वाहन उडविले होते. त्यात सशस्त्र दलाचे पाच जवान आणि जिल्हा पोलीस दलाचे दोघे असे सात जण शहीद झाले होते. त्यावेळी जवानांच्या जीपलाच नक्षलवाद्यांनी टार्गेट केल्याने त्यातून वाचणे त्यांना शक्य झाले नव्हते. दंतेवाडा जिल्ह्यातील छोलनार आणि किरंडूल गावांच्या परिसरात पोलीस व सशस्त्र दलाचे जवान एकत्रपणे नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना, हा स्फोट घडवून आणला होता.
दरम्यान, छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. विधानसभेच्या 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.