नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या सीमेवरील पेंगाँग त्सो तलावाच्या दोन्ही काठांवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया भारत व चीनने पूर्ण केली आहे. दरम्यान गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या संघर्षात चीनचे चार लष्करी अधिकारी व सैनिक मारले गेल्याचा व पाच सैनिक जखमी झाल्याचे चीनच्या लष्कराचे मुखपत्र असलेल्या पीएलए डेलीने प्रसिद्ध केले आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार भारत व चीनने केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसांत हे सैन्य मागे घेण्यात आले. पूर्व लडाखमध्ये ९ महिन्यांपूर्वी चीनच्या लष्कराकडून करण्यात आलेले घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते; तर चीनचे ४०हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा भारताने केला होता. परंतु त्यावेळी चीनने त्यांच्या सैन्याची नेमकी किती हानी झाली याची काहीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर गलवान खोऱ्यामध्येही चिनी सैनिकांशी भारतीय जवानांचा संघर्ष झाला होता. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. भारत व चीनने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानेही प्रयत्न सुरू केले होते. यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या स्तरावर अनेक फेऱ्या पार पडल्या दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये प्रारंभी झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या. अखेर पुन्हा चर्चा होऊन पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार करण्यात आला.
मतभेदांवर आज चर्चाभारत व चीनमध्ये असलेल्या मतभेदांच्या इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या, शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.