श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील लाझीबाल येथे सीआरपीएफच्या 96 बटालियनच्या गाडीवर गोळीबार केला. तीन जवान गोळीबारात जखमी झाले. दोन जवान गाडीच्या फुटलेल्या काचा लागल्याने जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. लष्कराने काश्मीरमध्ये ऑलआऊट मोहिम चालू केली आहे. या मोहिमेतंर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.
काश्मीर खोऱ्यात वावरणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून शोधून कंठस्नान घालण्यात येत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे.
या भागात काही दिवसांपासून लष्कराच्या हालचाली वाढल्या असून, तेथे लष्कराचे नवे तळ उभारण्यात येत आहेत. तसेच सीआरपीएफची राखीव तुकडीही येथे दाखल झाली आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ भाग दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. या परिसरात दहशतवादी मोकळेपणाचे फिरताना दिसायचे. मात्र आता येथे लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी एप्रिल महिन्यात लष्कराने शोपियाँमधील हेफ शीरमाल भागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी लष्कराला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ) च्या अधिकाऱ्यांनी शोपियाँमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देण्यास सुरुवात केली." शोपियाँ जिल्हा पीर पंजाल पर्वताच्या दक्षिणेस आहे. तसेच जम्मू विभागातील डोडा, किश्तवाड आणि पुंछ परिसरात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांच्या मार्ग आहे.
गेल्यावर्षी 8 जुलै रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय असलेल्या बुऱ्हाण वानी याला लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर या भागातून 37 तरुण बेपत्ता झाले होते. या सर्व तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पकडून ते दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान .या भागात लष्कराच्या हालचाली वाढल्यापासून गुप्त खबरी मिळू लागल्या असून, अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दहशतवाद्यांची भर्ती करणारा शेर मलदेरा आणि या दहशतवादी संघटनेला अर्थपुरवठा करणारा वासीम शाह यांचा समावेश आहे.