कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सातत्याने धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे चार बडे नेते आज नवी दिल्ली येथे भाजपचा भगवा हाती घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही नेते एका विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत.
यात, नुकताच राजीनामा दिलेले, माजी मंत्री राजीब बॅनर्जी, आमदार तथा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची मुलगी वैशाली दालमिया, आमदार प्रबीर घोषाल आणि हावडा नगरपालिकेचे माजी महापौर रथीन चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
राजधानी दिल्लीत शुक्रवारी इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आपला दोन दिवसीय बंगाल दौरा रद्द केला आहे. 30 आणि 31 जानेवारीला शाह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे अनेक हेवी वेट नेते भाजपत सामील होण्याची चर्चा होती. मात्र शाह यांचा बंगाल दौरा रद्द झाल्याने हे चारही नेते विमानाने दिल्लीला जात असल्याचे वृत्त आहे.
"बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही", ममता बॅनर्जी संतापल्या
हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जींना धक्का देत नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. भाजपा मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भट्टाचार्य यांचे स्वागत करण्यात आले.
आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत!
यावेळी, "आज बंगालमधील तरूण बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहेत. तरुणांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. बंगालमध्ये ममता सरकारकडे कोणतेही व्हिजन नाही. तसेच भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच आता मी आत्मनिर्भर बंगाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारधारेसोबत काम करणार आहे," असे म्हणज अरिंदम भट्टाचार्य यांनी त्यावेळी ममतांवर निशाणा साधला होता.