भारतात येताच चार तासांनी चित्त्यांनी केली मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:04 AM2022-09-18T06:04:00+5:302022-09-18T06:04:49+5:30

विशेष सुधारणा केलेल्या बोइंग विमानातून त्यांना शनिवारी सकाळी नामिबियातून ग्वाल्हेरला आणण्यात आले

Four hours after coming to India, the cheetahs had fun! | भारतात येताच चार तासांनी चित्त्यांनी केली मस्ती!

भारतात येताच चार तासांनी चित्त्यांनी केली मस्ती!

Next

शेवपूर (मध्य प्रदेश) : भारतात पाऊल ठेवल्यानंतर चित्त्यांनी चार तासांनी मस्ती केली. अन्नपाणी घेतल्यानंतर त्यांचा वावर सामान्य झाला. त्या आधी ते थोडे बिचकल्यासारखे होते. चार तासांनी पुन्हा त्यांचे तज्ज्ञांनी चेकअपही केले. 

विशेष सुधारणा केलेल्या बोइंग विमानातून त्यांना शनिवारी सकाळी नामिबियातून ग्वाल्हेरला आणण्यात आले. तेथून भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरमधून त्यांना पालपूर येथे आणण्यात आले. पालपूर येथून कुनो अभयारण्यातील शेवपूर हे ठिकाण जवळच आहे. तेथे उभारण्यात आलेल्या विशेष परिसरात चित्त्यांना सोडण्यात आले. या चित्त्यांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे. यानिमित्त उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय कृषी राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची उपस्थिती होती. 

झोपेत घालवतो अधिक काळ
चित्ता जास्त काळ झोपूनच घालवतो. वाघ-सिंह व बिबट्यांच्या तुलनेत चित्ते डरकाळी फोडत नाहीत. मादी चित्त्याचा गर्भकाळ ९३ दिवसांचा असतो. चित्ता जंगलात १० ते १२ वर्षे तर पिंजऱ्यात १७ ते २० वर्षे जगतो. संरक्षित वनांत शिकारी प्राण्यांची संख्या अधिक असल्यामुळे छाव्यांचा मृत्यूदर अधिक असतो.

एकांडा शिलेदार! 
पूर्ण वाढ झालेला चित्ता २ ते ५ दिवसांनी शिकार करतो. त्याला ३ ते ४ दिवसांतून एकदा पाणी प्यावे लागते. मादी एकटी राहते व केवळ संभोगापुरती जोडी बनवून छाव्यांना वाढवते. नरही एकटे राहतात. भाऊ मात्र सोबत राहून शिकार करतात.

आठ चित्ते तर आले; पण आठ वर्षांत १६ कोटी रोजगार का नाही आले. पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण केले नाही. 
-राहुल गांधी, काँग्रेस 

कारपेक्षा अधिक वेगवान
चित्ता कारपेक्षा अधिक वेगवान आहे. ३ सेकंदांत तो १०० मीटर अंतर कापतो. तथापि, ३० सेकंदांपेक्षा अधिक वेळ धावू शकत नाही. ऑलिम्पिकमधील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील विश्वविक्रम ९.८९ सेकंदांचा आहे, यावरून चित्त्याची गती किती अधिक आहे, हे कळावे. चित्त्याच्या शिकारीच्या यशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. बिबटे, तरस व जंगली कुत्रे चित्त्याची शिकार पळवतात.

‘म्याऊ म्याऊ’ अन्...
आफ्रिकेतून आल्यानंतर शनिवारी सकाळीच चित्ते ग्वाल्हेर मार्गे कुनोला पोहोचले आणि त्यांचा एक व्हिडीओ इंटरनेट मीडियावर व्हायरल झाला. त्यात चित्ता मांजराप्रमाणे म्याऊ म्याऊ करत होता. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी मांजर असल्याची टीका केली. मात्र, नंतर अभयारण्यात फिरताना चित्त्याचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा हे चित्ताच आहेत, अशी नेटकऱ्यांची 
खात्री पटली.

का केले म्याऊ-म्याऊ?
nवास्तविक, चित्ता हा कॅट्स म्हणजे मार्जार कुळातील सदस्य आहे. यात मांजरीसह चित्ता, बिबट्या, वाघ आणि सिंह यांचा समावेश होतो. यातील सर्वात मोठा सिंह आहे. 
nचित्त्याचे तोंड काहीसे मांजरासारखे असते. एकतर चित्ता मांजरासारखा आवाज करतो किंवा गुरगुरतो. पण, चित्ता गर्जना करत नाही. याबाबतचीही एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना फरक समजला.

Web Title: Four hours after coming to India, the cheetahs had fun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.