श्रीनगर/नवी दिल्ली : शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतरही काश्मीर धुमसतच असून, रविवारी अनेक घटनांनी खोऱ्यातील अशांततेत भर पडली. नियंत्रणरेषेवरून भारतात घुसणाऱ्या चार अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. पुंछमध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला व अधिकाऱ्यासह दोघे जखमी झाले. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल च दगडफेक करणारे आंदोलक यांच्यातील हिंसाचारात अनेक जखमी झाले. दरम्यान, गेल्या आठवड्यात पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्याने, ताज्या हिंसाचारातील मृतांची संख्या ७८ वर पोहोचली. नियंत्रणरेषेजवळ घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा डाव हाणून पाडत, सैन्याने चार अतिरेक्यांना रविवारी ठार मारले. नौगाम भागात घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावला, तर अन्य एका भागात तंगधरमध्ये दुसरा प्रयत्न हाणून पाडला आणि तिसरी घटना गुरेज भागात घडली. सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नौगाम भागात सीमारेषेजवळ सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. याच वेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही या अतिरेक्यांना लक्ष्य केले. या चकमकीत चार अतिरेकी मारले गेले. घटनास्थळावरून स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.’ आठवडाभरात परिस्थिती सुरळीत कराकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काश्मीरमधील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला. काश्मिरी युवकांना हिंसाचारासाठी चिथावणी देणाऱ्यांवर सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित करावे आणि एका आठवड्यात खोऱ्यातील परिस्थिती सुरळित होऊन, गेले दोन महिने बंद असलेले उद्योग-व्यापार, तसेच शाळा-कॉलेजे पुन्हा सुरू होऊन परिस्थिती सुरळीत होईल, यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.‘पेलेट’चा पुन्हा वापरदक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दगडफेक करणारे आंदोलक यांच्यात झालेल्या हिंसाचारात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, करिमाबाद व आजूबाजूच्या भागात राहणारे हजारो नागरिक रात्रीच्या छापेमारीच्या विरोधात रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले.सलग ६५व्या दिवशी निर्बंध काश्मिरातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. ५ आॅगस्टला पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर अन्य एका जखमीचाही मृत्यू झाला. श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी संचारबंदीसदृश प्रतिबंध लावण्यात आले आहेत. काश्मिरात सलग ६५ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीत आहे.
चार घुसखोर अतिरेक्यांना कंठस्नान
By admin | Published: September 12, 2016 4:37 AM