श्रीनगर : जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्येहिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. तसेच दोन पोर्टरचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) दुपारी जवानांची एक तुकडी पेट्रोलिंग करत असताना हिमस्खलन झाले. यामध्ये आठ जवान अडकले असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, जवानांना वाचविण्यासाठी लष्कराने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे.
लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास हिमस्खलनामध्ये पेट्रोलिंग करणारे आठ जवान अडकले. याबाबची माहिती मिळताच लष्कराचे एक पथक जवानांच्या शोधासाठी घटनास्थळी झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र, 18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा सुरुवातीला शोध लागला नाही. त्यानंतर यामध्ये चार जवानांसह दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
हिवाळ्यामध्ये उणे 60 अंशापर्यंत तापमान
जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असणाऱ्या या भागात हिवाळ्यात उणे साठ अंशापर्यंत तापमान असते. याठिकाणी हिमस्खलनाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.तसेच, याआधीही या भागात हिमस्खलन होऊन अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.