रायपूर : छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकीत एक पोलीसही जखमी झाला आहे. राज्याच्या नक्षल विभागाचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी बुधवारी येथे ही माहिती दिली. दंतेवाडा व सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस दलासह, एसटीएफ आणि डीआरजीच्या संयुक्त गस्ती पथकाला जंगलात पाठविण्यात आले होते. गस्ती पथक पुंगार डोंगराजवळील जंगलात असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात एका पोलिसाला गोळी लागून तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत चार नक्षलवादी मारले गेले. उर्वरित नक्षलवादी पळून गेले असून, गस्ती पथक त्यांचा पाठलाग करीत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, जंगलात चकमक सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि जखमी जवानाला जंगलातून बाहेर काढण्यात येत आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचे काही कमांडरही मारले गेल्याचे वृत्त आहे. तथापि, गस्ती पथक परतल्यानंतरच घटनेबाबत विस्तृत माहिती मिळू शकेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
छत्तीसगढमध्ये चार नक्षली ठार
By admin | Published: August 18, 2016 5:46 AM