उत्तर प्रदेशात दलित कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या, प्रियांका गांधी आज भेट देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:28 PM2021-11-27T12:28:57+5:302021-11-27T12:29:28+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या शनिवारी गोहरी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. पीडित कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच तक्रार केली होती. मात्र, काहीही कार्यवाही झाली नाही, असा आरोप पोलिसांवर होत आहे.
प्रयागराज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दलित कुटुंबातील ४ जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी येथील त्यांच्या घरात हे चौघे जण मृतावस्थेत आढळले. मृतांत १७ वर्षांची मुलगी असून, हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप या कुटुंबाच्या नातेवाईकांनी केला आहे. या हत्येचा आरोप त्यांनी शेजारी राहणाऱ्या सवर्ण जातीच्या कुटुंबावर केला आहे.
फुलचंद्र सरोज उर्फ फुले (५०), त्यांची पत्नी मिनू देवी (४५), मुलगा शिव (१०) यांचे मृतदेह अंगणात पलंगांवर पडलेले आढळले, तर त्यांची मुलगी सपना (१७) हिचा मृतदेह अंथरुणावर आढळला. दरम्यान, मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, हत्येचा तपास अनेक अंगांनी केला जात आहे. कुंपणाच्या भिंतीवरून समाजकंटक घरात शिरल्याचा संशय असून, त्यांनी झोपेत असलेल्या या कुटुंबावर हल्ला केला.
प्रियांका गांधी आज भेट देणार -
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या शनिवारी गोहरी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. पीडित कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच तक्रार केली होती. मात्र, काहीही कार्यवाही झाली नाही, असा आरोप पोलिसांवर होत आहे.
११ जणांवर गुन्हा -
पोलिसांनी सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा ११ जणांवर दाखल केला आहे. प्राथमिक तपासात शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सूचित होते आहे.