श्रीनगर : जम्मू- काश्मिरात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत झालेल्या तीन वेगवेगळ्या चकमकीत जैश- ए- मोहम्मदच्या पाकिस्तानी कमांडरसह चार अतिरेकी ठार झाले, तर एकाला अटक करण्यात आली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही चकमक काश्मीरच्या पुलवामा, गंदेरबल आणि कुपवाडा जिल्ह्यांत झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामात चेवाकला भागात रात्रभर चाललेल्या चकमकीत जैशचे दोन अतिरेकी आणि एक पाकिस्तानी नागरिक मारला गेला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्वीट केले की, पुलवामामध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी अतिरेक्याचे नाव जैशचा कमांडर कमाल भाई ‘जट्ट’ असे आहे. तो २०१८ पासून पुलवामा- शोपियांत सक्रिय होता. अनेक अतिरेकी कारवायांत तो सहभागी होता.
सुरक्षा दलाने चार- पाच ठिकाणी ऑपरेशन सुरू केले आहे. रात्रभर चार ते पाच ठिकाणी संयुक्त मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत पुलवामात एका पाकिस्तानीसह जैशचे दोन अतिरेकी, गंदेरबल आणि हंदवाडामध्ये लष्करचा एक अतिरेकी मारला गेला. हंदवाडा आणि पुलवामात कारवाई संपली आहे.
कुठे झाल्या चकमकी?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्य एका चकमकीत मध्य काश्मिरात गंदेरबल जिल्ह्यात सेरच भागात शनिवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तोयबाचा एक अतिरेकी मारला गेला. उत्तर काश्मिरात कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडाच्या नेचमा रजवार भागात सकाळी आणखी एक चकमक झाली. यात लष्करचा एक अतिरेकी मारला गेला.