नवी दिल्ली - विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही एअर होस्टेस आपल्या बॅगेत लपवून ही रक्कम घेऊन जात होती. तिने नोटांचे बंडल अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून एखाद्या खाद्यपदार्थासारखे दिसेल अशा तऱ्हेने बॅगेत लपवले होते." अटक करण्यात आलेली एअर होस्टेस जेट एअरवेज या विमान कंपनीची असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही एअर होस्टेस हवालाद्वारे परकीय चलन देशाबाहेर पाठवत असे. तसेच जेवढी रक्कम बाहेर पाठवली जाई, त्याच्या निम्मी रक्कम ती आपल्याकडे ठेवून घेत असे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एअर होस्टेस दोन महिन्यांपासून सातत्याने विमानातून पैसे पाठवत होती. अटक करण्यात आलेल्या एअर होस्टेसचा नोटांसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ज्यामध्ये एक महिला अधिकारी या एअर होस्टेसच्या बॅगेची तपासणी करून त्यामधून नोटांचे बंडल बाहेर काढत आहे. आता एअर होस्टेसच्या माध्यमातून परकीय चलन देशाबाहेर पाठवणारे नेटवर्क आणि त्यांच्या ठावठिकाण्याचा शोध घेण्यासाठी छापेमारी करण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 11:43 PM