तेलंगणात काँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार टीआरएसच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:18 AM2018-12-22T05:18:26+5:302018-12-22T05:18:44+5:30
तेलंगणामध्ये काँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश करणार आहेत.
हैदराबाद : तेलंगणामध्येकाँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश करणार आहेत. या सभागृहातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष टीआरएसमध्ये विलीन करावा, अशी विनंती त्यांनी विधान परिषदेचे सभापती के. स्वामी गौड यांना केली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला
आहे.
या चौघा आमदारांमध्ये एम. एस. प्रभाकर राव, टी. संतोष कुमार, के. दामोदर रेड्डी, अकुला ललिता यांचा समावेश आहे. राज्यातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या २० डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तेलंगणा विधान परिषदेत काँग्रेसचे सहा सदस्य असून, त्यातील चार जण दुसऱ्या पक्षात सामील होणार असतील त्या पक्षांतराला कायदेशीर अडचणी येणार नाहीत.
त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेस विधिमंडळ पक्ष तात्काळ टीआरएस विधिमंडळ पक्षात विलीन करावा, अशी मागणी या पत्रात काँग्रेसच्या चार आमदारांनी केली आहे. (वृत्तसंस्था)
आमदारांनी सभापतींना दिले पत्र
या पत्रात म्हटले की, तेलंगणा विधान परिषदेतील टीआरएस विधिमंडळ पक्षामध्ये विलीन होण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ आमच्याकडे आहे. राज्यघटनेतील १० व्या शेड्यूलमधील चौथ्या परिच्छेदातील तरतुदीचे पालन करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे.