मध्यप्रदेशातील भाजपचे आणखी चार आमदार बंडखोरीच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:15 AM2019-07-26T03:15:32+5:302019-07-26T03:15:49+5:30
कम्प्युटर बाबांनी केला दावा
भोपाळ : मध्यप्रदेशातील भाजपच्या दोन आमदारांनी विधानसभेत काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप श्रेष्ठींनी ताबडतोब दिल्लीत असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खा. राकेश सिंह यांना भोपाळला पाठवले. त्यांनी संबंधितांची भेट घेऊ न भाजपचे सारे आमदार एकत्र असल्याचा दावा केला; पण भाजपचे आणखी चार आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नारायण त्रिपाठी व शरद कौल या दोन आमदारांनी बुधवारी सरकारच्या बाजूने मतदान केले. नारायण त्रिपाठी यांनी तर काँग्रेसमध्ये जाण्याचा आपण विचार करीत असल्याचे जाहीर केले. आपली भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे या दोन आमदारांनी म्हटले आहे. हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्याशिवायही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि आमदार झालेले काही जण आहेत. त्यांच्यापैकी आणखी चार जण काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसशी जवळीक असलेल्या कम्प्युटर बाबांनी गुरुवारी जाहीर केले की भाजपमधील चार आमदार आपणास भेटले आहेत आणि ते काँग्रेसकडे पुन्हा येऊ इच्छितात. मुख्यमंत्री कमलनाथ सांगतील, तेव्हा त्या चौघांना आपण त्यांच्याकडे नेणार आहोत.
भाजपमध्ये एकजूट कायम असून कोणतीही गटबाजी अस्तित्वात नाही असे प्रदेशाध्यक्ष खा. राकेशसिंह म्हणाले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये भाजपत कोणतीही गटबाजी नाही. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात असून काहीही विपरीत घडलेले नाही. सूत्रांनी सांगितले की, नारायण यादव व शरद कौल या दोन आमदारांच्या भाजप नेते संपर्कात आहेत.
योग्य दखल घेत नसल्याची तक्रार
आमची भाजपमध्ये दखल घेतली जात नसल्याची तक्रार दोन आमदारांनी शिवराजसिंह चौहान यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. यापुढे तसे होणार नाही, असे आश्वासन त्यांना शिवराजसिंह चौहान यांनी दिले होते. मात्र, तरीही कमलनाथ सरकारने विधानसभेत मांडलेल्या मध्यप्रदेश फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयकावर या दोन भाजप आमदारांनी बुधवारी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते.