चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 08:08 PM2024-07-16T20:08:54+5:302024-07-16T20:09:42+5:30
राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 90 च्या खाली आली आहे.
BJP in Rajyasabha : लोकसभेत बहुमत गमावल्यानंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात आले आहे. राज्यसभेत पक्षाच्या सदस्यांची संख्या 90 च्या खाली आली आहे. याचे कारण म्हणजे, शनिवारी(दि.13) केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेल्या चार खासदारांचा कार्यकाळ संपला. यानंतर राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 86 वर आली. तर, NDA च्या खासदारांची संख्या 101 वर आली आहे. हा आकडा बहुमतापेक्षा खूपच कमी आहे.
राज्यसभेत सध्या 226 सदस्य अशून, 19 जागा अजूनही रिक्त आहेत. राज्यसभेच्या रिक्त असलेल्या 19 जागांपैकी 4 जम्मू-काश्मीरमधील आणि 4 नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत. तर, उर्वरित 11 जागा वेगवेगळ्या राज्यांतील आहेत, ज्यात आसाम, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे यापैकी अनेक जागा रिक्त झाल्या आहेत.
हे खासदार निवृत्त झाले
महेश जेठमलानी, सोनल मानसिंग, राम सकल आणि राकेश सिन्हा हे चार नामनिर्देशित खासदार शनिवारी निवृत्त झाले. चारही नामनिर्देशित खासदार भाजपमध्ये होते, त्यामुळे आता भाजपची संख्या 86 झाली आहे. एनडीएची संख्या 101 पर्यंत खाली आली आहे, जी सध्याच्या 113 च्या बहुमतापेक्षा कमी आहे. मात्र, 7 नामनिर्देशित उमेदवार आणि एक अपक्षही सरकारसोबत आहेत. त्यामुळे एनडीएचा आकडा 109 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत वरच्या सभागृहात बहुमत मिळवण्यासाठी सरकारला वायएसआर काँग्रेस (11) आणि एआयएडीएमके (4) यांची मदत घ्यावी लागू शकते.
असा आहे नंबर गेम
गेल्या टर्ममध्ये एनडीएला बीजेडी (9) आणि बीआरएस (4) यांचाही पाठिंबा होता. मात्र यावेळी बीजेडी पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहे. लवकरच राष्ट्रपतींकडून 4 जागांसाठी नामांकन केले जाणार असून इतर 11 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ज्या 11 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यापैकी किमान 10 जागांवर एनडीएचा विजय निश्चित आहे. म्हणजेच, भाजप 100 च्या जवळपास पोहोचेल आणि एनडीए बहुमतात असेल. दुसरीकडे, काँग्रेसकडे सध्या 26 खासदार आहेत, जे विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी आवश्यक असलेल्या 25 पेक्षा फक्त एकने जास्त आहेत. तेलंगणातील राज्यसभा पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसची संख्या 27 वर पोहोचू शकते.