नवी दिल्ली : न्या. भूषण रामचंद्र गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस व न्या.अज्जिकुत्तीरा सोमय्या बोपण्णा हे चार न्यायाधीश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले. या नव्या नियुक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३१ या कमाल मंजूर पदांएवढी पूर्ण झाली आहे. न्या. गवई यांच्या नेमणुकीने सर्वोच्च न्यायालयास १० वर्षांनंतर पुन्हा अनुसूचित जातीचा न्यायाधीश मिळाला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या चार नव्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची ‘वॉरन्ट’ जारी केली होती. न्यायालयाच्या क्र. १ च्या मुख्य न्यायदालनात झालेल्या छोटेखानी समारंभात सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी आपल्या या नव्या सहकारी न्यायाधीशांना पदाचीशपथ दिली. उन्हाळी सुटी सुरु असूनही इतरही अनेक न्यायाधीशया शपथविधीला आवर्जुन उपस्थित होते. या चारही न्यायाधीशांनी लगेच खंडपीठांवर बसून न्यायिक कामसुरुही केले.या नव्या न्यायाधीशांमध्ये कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नसलेले न्या. गवई एकटेच आहेत. ते याआधी मुंबई उच्च न्यायालयाचे १६ वर्षे न्यायाधीश होते. न्या. सूर्यकांत हिमाचल प्रदेश, न्या. बोस झारखंड तर न्या. बोपण्णा गुवाहाटी उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश होते. उच्च न्यायालयांमधील अनेक न्यायाधीशांची सेवाज्येष्ठता डावलून ‘कॉलेजियम’ने गुणवत्ता, सचोटी व वर्तणूक यांना प्राधान्य देत या चौघांच्या नावांची शिफारस सरकारला केली. न्या. गवई यांच्या बाबतीत अनुसूचित जातींना प्रतिनिधित्व देणे हा वाढीव निकष लावला गेला. न्या. बोस व न्य. बोपण्णा यांच्या नावांची एप्रिलमध्ये केलेली शिफारस सरकारने फेरविचारासाठी परत पाठविली होती. मात्र ‘कॉलेजियम’ने त्याच नावांवर पुन्हा शिक्कामोर्तब केले व त्यासोबत न्या. गवई व न्या. सूर्यकांत या नव्या नावांचीही शिफारस केली. यानंतर अवघ्या १५ दिवसांत या नव्या न्यायाधीशांचा शपथविधीही होणे हे लक्षणीय आहे.न्या. गवई यांच्या नियुक्तीने आता सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यासह न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड , न्या. उदय लळित व न्या. रोहिंग्टन नरिमन असे मूळचे महाराष्ट्रातील पाच न्यायाधीश झाले आहेत.न्या. गवई व न्या. सूर्यकांत होतील सरन्यायाधीशसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. त्यांच्यापैकी सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशास सरन्यायाधीशपदी नेमण्याची प्रथा, काही अपवाद वगळता, गेली ७० वर्षे पळली गेली आहे. आता असलेल्या ३१ न्यायाधीशांची वये लक्षात घेता न्या. गवई व न्या. सूर्यकांत यांना भविष्यात सरन्यायाधीश होण्याची संधी मिळेल. न्या. गवई २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होण्याआधी सहा महिन्यांहून थोडा अधिक काळ ते सरन्यायाधीश होतील. तसे झाल्यास न्या. के. जी. बाळकृष्णन यांच्यानंतरचे अनुसुचित जातीचे ते दुसरे सरन्यायाधीश ठरतील. त्यांच्यानंतर लगेच न्या. सूर्यकांत सरन्यायाधीश होतील व १० फेब्रुवारी २०२७ पर्यंत म्हणजे सुमारे दोन वर्षे त्या पदावर राहू शकतील. न्या. बोस व न्या. बोपण्णा हे मात्र त्याआधी अनुक्रमे एप्रिल २०२४ व मे २०२४ मध्ये निवृत्त होतील.