नवी दिल्ली : सरकारने रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदासाठी उमेदवारांच्या नावाची यादी लहान केल्यामुळे आता केवळ चारच जण रिंगणात उरले आहेत, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. यासोबत चलनविषयक धोरण समितीचीही (एमपीसी) लवकरच निवड केली जाणार आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. सरकारने गव्हर्नरपदासाठी निश्चित केलेल्या चार जणांपैकी तिघे केंद्रीय बँकांचे वरिष्ठ सदस्य आहेत, तर चौथा उमेदवार सर्वांत मोठ्या व्यावसायिक बँकेचा प्रमुख आहे. या चौघांत रिझर्व्ह बँकेचे उप गव्हर्नर ऊर्जित पटेल, माजी उप गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश असून, त्यांच्यापैकीच एक जण रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी होईल. राजन नव्या चलनविषयक धोरण समितीच्या तीन बाह्य सदस्यांची निवड करणाऱ्या समितीचे सदस्य असतील. राजन येत्या सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपद सोडतील आणि नवी चलनविषयक धोरण समिती आॅगस्ट महिन्यात स्थापन होणार आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांचा निवड समितीत समावेश असेल, असे सांगण्यात आले. निवड समितीद्वारे एमपीसीची निवड करण्यात येते. निवड समितीत कॅबिनेट सचिव, आरबीआयचे गव्हर्नर, अर्थ मंत्रालयातील सचिव आणि सरकारतर्फे निवडलेल्या तीन तज्ज्ञांचा समावेश असतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रिझर्व्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरपदासाठी चार नावे चर्चेत
By admin | Published: June 28, 2016 4:24 AM