उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:47 PM2019-06-11T12:47:31+5:302019-06-11T12:48:13+5:30

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

Four Passengers Die In Kerala Express Due To Heat | उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

Next

आगरा - देशात वाढत्या तापमानामुळे गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गरमीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील आगरा ते झांसी दरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक शहरात गरमीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. 

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन निजामुद्दीनपासून त्रिवेंद्रमला जात होती. आगरापासून ट्रेन निघाल्यानंतर पुढील प्रवासात ट्रेन थांबत थांबत पुढे जात होती. त्यामुळे ट्रेनमध्ये 5 प्रवाशांची तब्येत बिघडली. ज्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. झांसी रेल्वे स्टेशनवर या चार जणांचा मृतदेह उतरविण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. 

दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणतंही भाष्य केलं जात नाही. उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ मनोज कुमार सिंह यांनी तांत्रिक कारणामुळे ट्रेन उशीराने सुरु होती. मात्र या प्रवाशांची तब्येत आधीपासून खराब होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकेल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

दहा दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आगरा येथे फिरण्यासाठी आला होता. वाराणसीनंतर ते आगरा येथे पोहचले. हे सर्व प्रवासी स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. आगरा ते झांसी दरम्यान ट्रेन तांत्रिक कारणाने थांबत थांबत पुढे जात होती. या दरम्यान कोचमधील प्रवासी गरमीमुळे त्रस्त झाले होते. ट्रेनमध्ये कोणतीही उपचारासाठी सोय न मिळाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं होतं. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात गरमीमुळे हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. 
 

Web Title: Four Passengers Die In Kerala Express Due To Heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.