नवी दिल्ली - मेघालयमध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तुरा (Tura) येथून शिलाँग (Shillong) ला जाणारी बस बुधवारी रात्री 12 वाजता रिंगडी नदीत (Ringdi River) कोसळली. नदीतील पाण्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळा येत आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. या बचाव कार्यादरम्यान, आतापर्यंत चार मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयातील या अपघातग्रस्त बसमधून जवळपास 21 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 16 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं असून ते यामध्ये जखमी झाले आहेत. सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र जखमींपैकी काहींची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे अशी माहिती पोलिसांनी दिला आहे. हा अपघात नोंगचरम पुलावर झाला. बस वेगात होती. याचवेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रेलिंग तोडून थेट नदीमध्ये कोसळली.
दोन प्रवाशी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू
अपघाताची माहिती मिळताच ईस्ट गारो हिल्स पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ईस्ट गारो हिल्सचे डिप्टी कमिश्नर स्वप्नील तेम्बे यांनी दोन प्रवाशी बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच लवकरच त्यांना शोधण्यात येईल असं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालय ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस जेव्हा नदीमध्ये कोसळली तेव्हा त्यामध्ये 21 प्रवाशी प्रवास करत होते. राजधानीपासून जवळपास 185 किलोमीटर दूर ही दुर्घटना घडली आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.