आसाममध्येपाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53,000 लोकांना याचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. दक्षिण सलमारा-मनकाचर जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रेमध्ये रविवारी रात्री बोट उलटल्याने एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि दोन जण बेपत्ता झाले, तर कछार, पश्चिम कार्बी आंगलाँग आणि उदलगुरी या भागात वादळामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांना फोन करून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) चे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी सांगितलं की, वादळासह रविवारी संध्याकाळी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे अनेक झाडं आणि विजेचे खांब खाली पडले आणि घरांचं मोठं नुकसान झालं.
त्रिपाठी यांनी पीटीआयला सांगितलं की, “शिशुमारा घाटातून नेपुरेर अल्गा घाटाकडे जात असताना काल संध्याकाळी पाच वाजता नेपुरेर अल्गा गावात एक बोट बुडाली. स्थानिक लोकांनी एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून दोन जण बेपत्ता आहेत. समीन मंडल (4) असं मृताचं नाव असून कोबट अली मंडल (56) आणि इस्माईल अली (8) हे बेपत्ता आहेत.
एसडीआरएफच्या पथकाने आज सकाळी शोध मोहीम सुरू केली, त्रिपाठी म्हणाले की ASDMA पाळत ठेवण्यासाठी पायलटसह ड्रोन पाठवत आहे. बोटीत 15 प्रवासी होते, पण बाकीच्या लोकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. याच दरम्यान, कछार येथे एका महिलेला वादळामुळे जीव गमवावा लागला.
एएसडीएमएने सांगितलं की, पश्चिम कार्बी आंगलोंगमधील डोनका येथील पिंटू चौहान (17) आणि उदलगुरी येथील मजबत येथील रूपराम बासुमातारी (46) यांचा वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय वीज पडल्याने सहा जण जखमी झाले असून त्यांना सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ASDMA ने बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की वादळामुळे 22 जिल्ह्यांतील 919 गावांमधील सुमारे 53,000 लोकांना फटका बसला आहे आणि एकूण 14,633 घरांचं नुकसान झालं आहे.