पुलवामा, दि. 26 - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान शहीद झाले असून, पाचजण जखमी झाले आहेत. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, पुलवामाच्या या तळावर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मोठया संख्येने आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा एक आणि सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे.
पोलीस तळावरील इमारतीत घुसल्यानंतर या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत ग्रेनेड फेकले. सहाजखमींमध्ये तीन सीआरपीएफचे जवान आहेत. या ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षापथकांमध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी घुसलेले इमारत रिकामी करण्यात येत असून, आसपासच्या इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत.
तीन मजली इमारतीमधून दहशतवादी गोळीबार करत असून, अनेक पोलीस तिथे अडकून पडले आहेत. या दहशतवाद्यांनी अद्यापपर्यंत कोणलाही बंधक बनवून ठेवलेले नाही अशी माहिती अधिका-यांनी दिली.
भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्तजम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे.
यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे.