MP Crime:मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान चार जणांची हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली. दोन कुटुंबांमध्ये झालेल्या या हिंसक संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. शेतातील जुगारावरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत अनेकांनी शस्त्रांचा वापर केला गेल्याचेही बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन कारवाई सुरु केली आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील टिमरी गावात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात चौघांना आपला जीव गमवावा लागला. पाठक आणि साहू कुटुंबात जुने वाद होता आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या बाबत पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
सोमवारी अकराच्या सुमारास टिमरी गावात पाठक आणि साहू कुटुंबातील वादाला हिंसक वळण लागले. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांवर साहू कुटुंबाच्या लोकांनी हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर लाठ्या, तलवारीने हल्ला केला. या संघर्षात पाठक कुटुंबातील सतीश पाठक, मनीष पाठक आणि दुबे कुटुंबातील अनिकेत दुबे आणि समीर दुबे यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी विपिन दुबे आणि मुकेश दुबे हे गंभीर जखमी असून त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आमच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप तिथल्या लोकांनी केला. तणाव वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने आजूबाजूचया पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात केला आहे. आरोपींना लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.