पाटणा : संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील दनवार गावात शुक्रवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात सरकारने ८ पोलिसांना निलंबित केले आहे. या प्रकरणात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून दारूच्या काही बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत.अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी सांगितले की, मृतांत दनवार गावातील रहिवासी आहेत. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. गंभीर दोघांना उपचारासाठी जमुहारस्थित नारायण मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास शाहबादचे पोलीस उपमहानिरीक्षक करीत आहेत.कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत कछुआ ठाण्याच्या प्रमुखांसह सहायक निरीक्षक व शिपाई अशा आठ जणांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन वरिष्ठ अधिकाºयांना लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रोहतासच्या जिल्हाधिकाºयांनी सांगितले की, या विभागाचेउत्पादन निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाईचा प्रस्ताव प्रधान सचिवांना पाठविण्यात आलाआहे. रोहतासचे सहायक उत्पादन आयुक्त किशोर कुमार शाह यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये विषारी दारूचे चार बळी , ८ पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 2:44 AM