सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 12:47 PM2019-12-23T12:47:39+5:302019-12-23T12:48:06+5:30
महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक निकालातील समान धागे
रांची: महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यामध्ये भाजपा सत्तेपासून दूर राहणार असल्याचं दिसत आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपा ३० जागांवर पुढे आहे. त्यामुळे आणखी एक राज्य भाजपाच्या हातातून जाणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणूक निकालात अनेक समान धागे असल्याचं दिसतं. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या साथीनं सरकार स्थापन केलं. झारखंडमध्ये जेएमएमनं (झारखंड मुक्ती मोर्चा) भाजपाला धक्का दिला. विशेष म्हणजे शिवसेना आणि जेएमएम यांचं निवडणूक सारखंच आहे. हे दोन्ही पक्ष धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतात.
महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीतील दुसरं साम्य थेट भाजपाशी संबंधित आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. झारखंडमध्ये भाजपा सर्वाधिक ३० जागांवर पुढे आहे. तर महाराष्ट्रात भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या. मात्र तरीही भाजपाला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. त्याचीच पुनरावृत्ती आता झारखंडमध्ये होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. झारखंडमध्येही तीन पक्षांची आघाडी (झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल) सत्तेत येताना दिसत आहेत. मात्र दोन्ही राज्यांमधील तीन पक्षांच्या आघाडीत फरक आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलानं निवडणुकीआधीच आघाडी केली. तर महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तयार झाली.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि झारखंडचे मावळते मुख्यमंत्री आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीत एक समान धागा आहे. झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते रघुबर दास पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिलेच बिगर-आदिवासी मुख्यमंत्री आहेत. झारखंड आदिवासीबहुल राज्य असतानाही भाजपानं त्यांना मुख्यमंत्रिपदं दिलं आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. मराठ्यांचं वर्चस्व असलेल्या राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री ठरले, ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. महाराष्ट्रात भाजपानं फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, तर झारखंडमध्ये दास यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचं नेतृत्त्व केलं.