श्रीनगर: पाकिस्तानातून काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या व शस्त्रे, दारूगोळ्याचा मोठा साठा घेऊन एका ट्रकमधून जात असलेल्या चार दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी बुधवारी एका चकमकीत खात्मा केला. त्यामुळे २६ जानेवारी रोजी असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या कारवायांना अटकाव करण्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.
या चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून सात एके रायफली, एक एमएफ रायफल, तीन पिस्तूल, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तावी पुलानजीक सिध्रा बायपासजवळ बुधवारी सकाळी साडेसात वाजता ही चकमक झाली. ती ४५ मिनिटे सुरू होती. यादरम्यान दाट धुक्याचा फायदा घेऊन ट्रकचा ड्रायव्हर पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, त्याचा शोध सुरू आहे.
आगामी प्रजासत्ताकदिनी किंवा त्याआधी कोणत्याही घातपाती कारवाया होऊ नयेत याकरिता सुरक्षा दले सतर्क आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गृहमंत्री शहांनी घेतला सुरक्षा आढावा
- दहशतवाद्यांना बुधवारी सकाळी कंठस्नान घातल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि विकासाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला.
- यासदंर्भातील बैठकीत, गृहमंत्र्यांनी केंद्रशासित प्रदेशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी उचललेल्या पावलांचा आढावा घेतला.
- या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, निमलष्करी दल, प्रशासन आणि पोलिस उपस्थित होते.
काश्मिरी पंडितांची ‘हिट लिस्ट’
- महिन्याच्या सुरुवातीला खोऱ्यात काम करणाऱ्या काश्मिरी पंडित समुदायातील ५६ कर्मचाऱ्यांची ‘हिट लिस्ट’ लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने जारी केल्यानंतर त्यांच्यात घाबराटीचे वातावरण होते.
- २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून जुलै २०२२पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच काश्मिरी पंडित आणि अन्य १६ हिंदू आणि शिखांसह ११८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने संसदेत दिली होती.
राहुल यांना वातावरण बिघडवायचे आहे का?
राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमधील वातावरण बिघडविण्याची इच्छा आहे का? असा सवाल केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. काश्मीरमध्ये काँग्रेसने तिरंगा झेंडा फडकविण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भात ठाकूर यांनी हे वक्तव्य केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"