नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. आता आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डेल्टा प्लस (B.1.617.2.1) सोबतच कोविड-१९ चे किमान चार नवे व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतात, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या चार नव्या व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. यामध्ये B.1.617.3, डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2), B.1.1.318 आणि लॅम्बडा (C.37) चा समावेश आहे. कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. कोरोनाच्या कापा व्हेरिएंटवरही (B1.617.1) लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र हा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या तुलनेत कमी संक्रामक आहे. कोरोनाचे B.1.617.3 आणि B.1.1.1.318 व्हेरिएंट भारतात आढळून आले आहेत. मात्र लॅम्बडा व्हेरिएंटचा रुग्ण अद्याप तरी आढळलेला नाही.
लॅम्बडा व्हेरिएंट जगातील बऱ्याच देशांमध्ये वेगानं पसरत आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीमुळे या व्हेरिएंसह नव्या व्हेरिएंटचं कॉकटेल भारतात येऊ शकतं, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नव्या रुपांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी जीनोम सिक्वन्सिंग करण्याची गरज आहे.
काय म्हणतात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ?म्युटेशन झाल्यानंतर विषाणूचा फैलाव वाढतो. त्यांच्या संक्रमणाच्या वेगात वाढ होते. त्यामुळे जीनोम सिक्वन्सिंग वाढवण्याची गरज असल्याचं मत हैदराबादमधील यशोदा रुग्णालयाचे सल्लागार डॉ. विघ्नेश नायडू यांनी व्यक्त केलं.
लॅम्बडा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड या आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे. भारतात लॅम्बडाचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. जीनोम सिक्वन्सिंग वाढवल्यास कदाचित याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक वाढल्यास लॅम्बडा व्हेरिएंट भारतात शिरकाव करू शकेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.