ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 25 - उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. राज्यातील यमुना एक्स्प्रेस वे वर चार महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी यमुना एक्स्प्रेस वेवरून कारमधून जेवर येथून बुलंदशहरकडे जात असलेल्या एका परिवाराला लुटारूंनी वाटेत अडवून लुटले. तसेच या कुटुंबातील प्रमुखाची हत्या करून चार महिलांवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे.
पीडित कुटुंबातील प्रमुखाच्या बहिणीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला पाहण्यासाठी ही मंडळी जात होती. दरम्यान, वाटेत लुटारुंच्या टोळक्याने अडवून त्यांची लुटमार केली. तसेच कुटुंबातील महिलांवर सामूहिक बलात्कार केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना एसएसपी लव कुमार म्हणाले, काल रात्री जेवर भागातील सबौता गावात काल अर्धा डझन हत्यारबंद लुटारूंनी कारमधून प्रवास करत असलेल्या परिवाराला आपली शिकार बनवले. त्यांनी कारच्या टायरवर गोळी मारून गाडी अडवली. त्यानंतर लुटारूंना विरोध करत असलेल्या या कुटुंबीतील प्रमुखाला लुटारूंना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर पीडित परिवाराकडील दागिने आणि सुमारे 45 हजार घेऊन आरोपी फरार झाले.