नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एक चिमुकला खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. चार वर्षांचा चिमुकला हा खेळताना 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला आहे. चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील कुलपहाड परिसरात बुधौरा गावात ही घटना घडली आहे. भागीरथ कुशवाह या शेतकऱ्याचा 4 वर्षांचा मुलगा धनेंद्र 30 फूट खोल बोअरवेलसाठी खणलेल्या खड्ड्यात खेळता खेळता पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि जेसीबीची टीम, अधिकारी घटनास्थळी दाखळ झाले आहेत. शेतात असताना ही घटना घडली आहे.
भागीरथ यांच घर हे शेतापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्याची पत्नी आणि लहान मुलगी सकाळी आधारकार्डचं काम कऱण्यासाठी महोबा येथे आले होते. तर भागीरथ आपल्या मुलाला आणि दुसऱ्या मुलीला घेऊन शेतावर काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीरथ शेताला पाणी देत असताना तर दोन्ही मुलं झाडाखाली खेळत होती.
शेतात असलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात धनेंद्र पडला. खूप वेळ झाला तरी धनेंद्र बाहेर न आल्याने त्याच्या बहिणीने वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी धनेंद्रला आवाज दिला तर खड्ड्यातून जोरजोरात रडण्याचा आवाज आला. शेतकरी भागीरथ यांनी याची माहिती पोलिसांना दिली. अग्निशन दल, पोलीस प्रशासन, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बचावकार्य सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.