उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका चार वर्षांच्या मुलीने आपल्या ७४ वर्षीय वडिलांना मुखाग्नी दिला आहे. पप्पांना काय झालं आहे, पप्पा कुठे गेले? असे प्रश्न चिमुकली विचारत होती. मात्र तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचे आणि नातेवाईकांचे डोळे पाणावले. टेस्ट ट्यूब पद्धतीने या मुलीचा जन्म झाला होता.
देवेंद्र त्यागी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघांचंही लग्न झालं होतं. २०१८ मध्ये त्यांचा ३६ वर्षीय मुलगा राहुल त्यागीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला होता. एका महिन्यानंतर, त्यांची मुलगी प्राची हिचाही मृत्यू झाला. यानंतर नियतीने देवेंद्र यांना आणखी एक धक्का दिला. या संकटकाळात देवेंद्र यांचा जावई आणि सून त्यांच्यापासून दूर गेले.
देवेंद्र यांचे नातेवाईक राजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई आणि सुनेने पुन्हा दुसरं लग्न केलं आणि ते आता वेगळे राहतात. अशा परिस्थितीत देवेंद्र आणि त्यांची पत्नी मधू यांना एकटे राहावं लागलं. त्यांना एकटेपणा जाणवत होता. तसेच परिस्थितीचा त्रास होत होता.
राजीव त्यागी यांच्या म्हणण्यानुसार - देवेंद्र त्यांच्या मुलगा आणि मुलीच्या मृत्यूने दु:खी झाले होते. तसेच त्यांची नातवंड देखील त्यांच्यासोबत नव्हती. वयाच्या या टप्प्यावर देवेंद्र आणि त्यांची पत्नी मधू यांच्यापुढे कोणताही पर्याय उरला नव्हता. अशा स्थितीत दोघांनीही ठरवलं की आपण आपला वंश पुढे जाण्यासाठी टेस्ट ट्यूब पद्धतीचा अवलंब करायचा.
२०२० मध्ये, वयाच्या 70 व्या वर्षी, देवेंद्र आणि त्यांची पत्नी मधू यांनी टेस्ट ट्यूब पद्धतीने एका मुलीला जन्म दिला, जी आता चार वर्षांची आहे. मात्र काल देवेंद्र त्यागी यांचं निधन झालं. आता कुटुंबात पत्नी मधू आणि चार वर्षांची मुलगी यांच्याशिवाय कोणीच नाही. त्यामुळे चार वर्षांच्या मुलीने वडिलांना मुखाग्नी दिला ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले.