नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने एका व्यक्तीवर आपल्या चार वर्षांच्या भाचीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली आहे. व्यक्तीने रुग्णवाहिकेसाठी प्रशासनाकडे मदत मागितली होती. पण त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. शेवटी हतबल झालेल्या व्यक्तीने भाचीचा मृतदेह खांद्यावर ठेवला आणि तो घराच्या दिशेने निघाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. चिमुकलीच्या मृतदेह खांद्यावरून घेऊन एक व्यक्ती पायी जात असल्याचं काही लोकांनी पाहिलं. त्यांनी या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर याता हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून लोकांनी शिवराज सरकारवर निशाणा साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला उपचारासाठी छतरपूरच्या बक्सवाहा सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. पण तिथे तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला छतरपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण याच दरम्यान चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घर पाठवण्याची विनंती करण्यात आली. पण रुग्णवाहिका मिळाली नाही.
वाहनांचा अभाव असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर व्यक्तीने आपल्या भाचीचा मृतदेह खांद्यावर ठेवून घर गाठलं. या घटनेनंतर मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाथोरिया यांनी याप्रकरणी सीएमओ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून याप्रकरणी कोण जबाबदार आहे याची माहिती घेऊ. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करू असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.