मजुरांसाठी सोमवार ठरला 'डायमंड डे'; एकाच दिवशी सापडले 7 मौल्यवान हिरे, किंमत तब्बल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:09 PM2021-12-07T16:09:16+5:302021-12-07T16:45:10+5:30
अधिकाऱ्यांनी दिलेल्या अंदाजानुसार, एका हिऱ्याची किंमत 60 लाखांपेक्षा अधिक आहे.
पन्ना: मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) पन्नामध्ये(Panna) हिऱ्याचे मोठे भांडार आहे. या ठिकाणी अनेकदा हिरा सापडल्याच्या बातम्या समोर येतात. अशीच एक बातमी आता समोर आली आहे. एकाच दिवशी चार मजुरांना हिरे मिळाले आहेत. दोघांना तीन मोठे हिरे आणि इतर दोघांना चार छोटे हिरे मिळाले आहेत.
13.54 कॅरेटचा हिरा सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, पन्नातील रतनगर्भा परिसारील कृष्णा कल्याणपूर खाण परिसरात हे सर्व हिरे सापडले आहेत. मजुरांनी हे सर्व हिरे कार्यालयात जमा केले आहेत. हिरे कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी सांगितले की, राहुनिया गावचे रहिवासी मुलायम सिंह गौर यांना 13. 54 कॅरेटचा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा मौल्यवान आणि सर्वोत्तम दर्जाचा आहे.
मुलायम सिंह यांच्यासह पन्नाच्या एनएमडीसी कॉलनीत राहणाऱ्या रोहित यादवलाही हिरे सापडले आहेत, ज्यामध्ये 6 , 8 आणि 4.68 कॅरेटच्या हिऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, शिवराजपूर येथील शारदा विश्वकर्मा यांना दोन छोटे हिरे मिळाले आहेत. हे सर्व हिरे सध्या हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहेत.
लिलावानंतर रक्कम मिळेल
अनुपम सिंह यांनी सांगितले की, मजुरांनी जमा केलेले हिरे लिलावाद्वारे विकले जातील. विक्रीनंतर मध्य प्रदेश सरकारची 10 टक्के रॉयल्टी कापून उर्वरित रक्कम या गरीब मजुरांना दिली जाईल. 13.54 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत 60 लाखांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. एका अंदाजानुसार, रॉयल्टीची रक्कम कापूनही शेतकरी मुलायम सिंह यांना 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. ही केवळ अंदाजे रक्कम आहे, लिलावानंतरच खरी स्थिती कळेल. तर, इतर हिऱ्यांनाही लाखो रुपये किमत मिळण्याचा अंदाज आहे.