नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी १४ हजार रुपयांचे भाडे आकारणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाला अटक करण्यात आली आहे.
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने दिवसेंदिवस नवीन रुग्णांसोबत मृतांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे, अशा संकटातही मृतांच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे प्रकार समोर येत आहेत. अवघे सहा किलोमीटर दूर असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चालक कंधी लाल भरमसाठ पैसे आकारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने सापळा टाकला. कॉन्स्टेबल महेशने या चालकाला फोन करुन कोविड-१९ ने मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह न्यू लाईफ इस्पितळातून निगम बोध घाटात न्यायचा आहे, असे कळविले. चालक कंधी लालने १४ हजार रुपये लागतील, असे सांगत पैशासाठी चिठ्ठी पाठविली.
फक्त सहा कि.मी.साठीn लाईफ इस्पितळ ते निगम बोध घाटदरम्यानचे अंतर फक्त सहा किलोमीटर आहे. एवढ्यासाठी हा रुग्णवाहिका चालक खूप पैसे आकारत असल्याचे आढळले, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वायव्य) गुरीकबाल सिंग संधू यांनी सांगितले. चालक कंधी लाल हा जमुना बाजारचा रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.