ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 2 - सामुहिक बलात्काराची बळी ठरलेल्या 35 वर्षीय महिलेवर लखनऊमध्ये पुन्हा एकदा अॅसिड हल्ला करण्यात आला. हा तिच्यावर झालेला चौथा अॅसिड हल्ला आहे. पीडितेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
शनिवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान अलीगंज भागात या महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आला. हॉस्टेलबाहेर पाणी भरण्यासाठी गेली असताना हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अॅसिड हल्ला पीडितांकडून चालवण्यात येणा-या हॉटेलमध्ये ही महिला काम करते. तिच्या चेहऱ्यावर, मानेवर भाजले असून तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या महिलेला पोलिसांनी सुरक्षा दिली होती पण हल्ला झाला त्यावेळी सुरक्षेसाठी असलेला पोलीस शिपाई हा हॉस्टेलमध्ये होता अशी माहिती आहे.
23 मार्च रोजी या महिलेला ट्रेनमध्ये बळजबरीने अॅसिड पाजण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर दुस-या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पीडित महिलेची रुग्णालयात भेटही घेतली होती. तसेच नुकसानभरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याची घोषणाही केली होती.
2008 मध्ये उंचाहर येथील राहत्या घरी या महिलेवर मालमत्तेच्या वादातून दोन पुरूषांनी सामुहिक बलात्कार केला होता, त्यानंतर तिच्यावर अॅसिड फेकण्यात आलं होतं. या प्रकऱणी दोन जणांना अटक कऱण्यात आली होती तो खटला अजूनही सुरू आहे. आता झालेल्या हल्ल्यालाही याच प्रकरणाशी जोडून बघितलं जात आहे. याशिवाय 2011 ते 2013 च्या काळात या महिलेवर अनेकदा अॅसिड हल्ला झाला होता. पीडित महिलेला दोन मुलं आहेत.