नवी दिल्ली : धुळे आणि सोलापूर या दोन शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ च्या औरंगाबाद ते तेलवाडी दरम्यानच्या ८७ किमी पट्ट्याचे चौपदरीकरण करण्याच्या सुमारे २,१०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला बुधवारी मंजुरी मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने ही मंजुरी दिली. चौपदीरणाचे हे काम राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या चौथ्या टप्प्यातील एक काम म्हणून केले जाईल. हे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर खासगी कंत्राटदाराकडून करून घेतले जाईल व त्याचा खर्च टोल लागू करून वसूल केला जाईल, असे या निर्णयानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मंजूर केल्या गेलेल्या या रकमेतून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाखेरीज जमीन संपादन करणे व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे यासह बांधकामापूर्वीची कामेही होतील.महामार्गाच्या या चौपदरीकरणामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासास हातभार लागेल व खासकरून औरंगाबाद ते तेलवाडी या पट्ट्यात होणारी अवजड वाहनांची कोंडी दूर होऊन वाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल. रस्ते वाहतूक सुलभ झाल्याने त्या भागातील आर्थिक-सामाजिक जीवनमान उंचावेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महामार्गाच्या या कामामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. एक किमी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी साधारणपणे ४,०७६ मनुष्यदिन लागतात. या हिशेबाने या कामामुळे ३.५४ लाख मनुष्यदिन एवढा रोजगार स्थानिकांना उपलब्ध होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२००० कोटींचे चौपदरीकरण
By admin | Published: June 30, 2016 4:00 AM