मुंबई : करचोरीकरणाऱ्यांच्या भोवती सरकारने खटल्यांचा फास आवळला आहे. विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांसह काही वर्गवारीतील करचोरांना आता केवळ दंड भरून सुटका करून घेता येणार नाही. त्यांना खटल्यांनाही सामोरे जावे लागेल.केंद्रीय थेट कर बोर्डाने (सीबीडीटी) यासंबंधीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. तडजोड करण्याजोग्या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या सूचना १७ जूनपासून अमलात येतील. या तारखेनंतर तडजोडीसाठी येणाऱ्या सर्व अर्जांवर नव्या सूचना लागू होतील. या आधी २४ डिसेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या जागी नव्या सूचना आणण्यात आल्या आहेत.ध्रुव अॅडव्हायजर्सचे भागीदार संदीप भल्ला यांनी सांगितले की, आधीच्या मार्गदर्शक सूचनांत विदेशातील अघोषित बँक खाती आणि विदेशी मालमत्ता या प्रकरणातही तडजोडीला वाव होता. करदात्याने सहकार्य केल्यास तसेच कर भरल्यास तडजोड होत असे. दरम्यानच्या काळात काळा पैसा विरोधी कायदा २0१५ लागू झाला. या कायद्यात विदेशी अघोषित बँक खाती आणि विदेशी मालमत्ता याबाबत तडजोडीस परवानगी नाही. या कायद्यात ३0 टक्के दंड भरून सुटण्याची तरतूद मात्र केलेली आहे. (वृत्तसंस्था)आरोपींकडे तडजोडीचा पर्यायच ठेवला नाहीतथापि, आता नव्या मार्गदर्शक सूचनांत आणखी कडक पावले उचलण्यात आली आहेत. काळा पैसा विरोधी कायद्याशी संबंधित खटले आणि विदेशी खाती व मालमत्ता या संबंधीचे खटले अशा दोन्ही प्रकारांतील गुन्ह्यात आता तडजोडीचा पर्यायच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ दंड भरून आरोपीची सुटका होणार नाही. या आरोपींना खटल्यांचाही सामना करावा लागेल.
करचोरांभोवती फास आवळला; दंड भरा, खटलेही चालवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 1:42 AM