उत्तर प्रदेशमधिल सुल्तानपूर येथे एका अस्थिरोगतज्ज्ञाकडून झालेल्या हलगर्जीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे डॉक्टरांनी एका वृद्ध महिलेच्या तुटलेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे. ऑपरेशन थिएटरमधून जेव्हा या महिलेला आणण्यात आले तेव्हा तिला पाहून तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. कारण महिलेच्या दुखापतग्रस्त पायाऐवजी दुसऱ्याच पायावर डॉक्ररांनी शस्त्रक्रिया केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टरांनी फ्रॅक्चर झालेल्या दुसऱ्या पायावर शस्त्रक्रिया केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासन सारवासारव करण्यात गुंतलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रतापगड जिल्ह्यातील सिकरी कानूपूर गावातील रहिवासी असलेली भुईला देवी हिच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला चालता फिरता येत नव्हते. त्यामुळे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर नातेवाईकांनी या महिलेला सुल्तानपूर येथील एका रुग्णालयात दाखल केले. तिथे गुरुवारी भुईला देवी हिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा महिलेला बाहेर आणमण्यात आलं तेव्हा तिला पाहून नातेवाईकांना धक्का बसला. भुईला देवी हिचा मुलगा सुरेश प्रजापती याने केलेल्या दाव्यानुसार त्याच्या आईच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालेलं होतं. मात्र डॉक्टरांनी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर भुईला देवी हिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तसेच तिच्या तुटलेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जीपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पी. के. पांडेय हे रुग्णालयातून गायब झाले. तर रुग्णालयाकडून घडल्या प्रकाराबाबत सारवासारव केली जात आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, रुग्णाच्या डाव्या पायाच्या हाडालाही दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर तर उजव्या पायामध्ये सूज होती आणि रक्त जमा झालेलं होतं. ते काढण्यात आलं. चुकीचा शस्त्रक्रिया झाल्याचा करण्यात येत असलेला दावा बनावट आहे.