ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सैनिकांसोबत फ्रान्सचे सैनिक राजपथावर परेड करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस ओलांदे उपस्थित राहणार आहेत.
सरकारी सुत्रांकडून मिऴालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्स सैनिकांची एक तुकडी भाग घेणार आहे. या सोहळ्यात पहिल्यांदाच विदेशातील लष्कर सहभागी होत असून राजपथावर परेड करणार आहे.
फ्रान्समधील सातव्या आर्मर्ड ब्रिगेडच्या ३५ व्या इनफ्रन्ट्री रेजिमेंटचे ५६ जवान भारतात असून त्यांचा आजपासून राजस्थानमध्ये संयुक्त सराव सुरु आहे. दहशतवाद्यांशी लढण्याचा हा संयुक्त सराव करण्यात येत असून याला शक्ती-२०१६ असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, या फ्रान्सच्या तुकडीचा प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत विदेशातील कोणत्याही लष्कराने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला नाही, त्यामुळे फ्रान्सच्या सैनिकांची परेड ऐतिहासिक ठरणार आहे.