Russia-Ukraine War: युक्रेनमधून मुलीला भारतात आणतो, महिलेची 42 हजार रुपयांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 10:13 PM2022-02-27T22:13:42+5:302022-02-27T22:17:26+5:30
युक्रेनमध्ये 20 हजाराहून अधिक भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
Russia-Ukraine War: रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण जगभरावर उमटताना दिसत आहेत. युक्रेनमधील नागरिक जीव मूठीत घेऊन घरात आसरा घेऊन आहेत. तर परदेशातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले विद्यार्थी, नागरिक मायदेशात परतण्यासाठी धडपड करत आहेत. यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. तर, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी भारतात असलेले त्यांचे पालक चिंताग्रस्त बनले असून पाल्यास मायदेशी आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, या परिस्थितीतही एकाने युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची 42 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
युक्रेनमध्ये 20 हजाराहून अधिक भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्याही सुखरूप सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तर, केंद्र सरकारनेही ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना चिंता लागल्याने ते स्वत:ही प्रयत्न करत आहेत. मात्र, या युद्धजन्य परिस्थितीलाही लुटण्याची संधी समजून एकाने 42 हजारांना गंडा घातला आहे.
मध्य प्रदेशच्या विदिशा येथील हे प्रकरण असून एका महिलेस 42 हजार रुपयांना फसविण्यात आले. एका व्यक्तीने आपण पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगत महिलेस फोन केला. तसेच, त्या महिलेच्या युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीला भारतात आणण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी, काही पैसे लागतील असेही सांगितले. महिलेनं मुलीच्या काळजीनं आणि भाबड्या अपेक्षेनं त्या व्यक्तीला 42 हजार रुपये दिले. मात्र, मुलीच्या तिकीटाची कॉपी मिळेना, तसेच तो ठग महिलेचा फोनही उचलेना. त्यामुळे, पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तो आरोपी हरयाणाच्या गुरुग्राम येथील असल्याचे समोर आले आहे.
विदिशा येथील वैशाली विल्सन यांची मुलगी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. वैशाली सोशल मीडियातून सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मदतीची याचना करत आहे. याचाच फायदा घेत ठगाने महिलेशी संपर्क करुन अधिकारी असल्याचा बनाव केला. त्यानंतर, तिकीट आणि कार्यलयीन कार्यवाहीसाठी 42 हजार रुपयांची मागणी केली.
मुख्यमंत्री ठाकरेंचंही आवाहन
"युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत", अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
युक्रेनमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय अडकले
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं प्रयत्न सुरू केले होते. मंगळवारी एअर इंडियाच एक विमान २५० हून अधिक जणांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. तसंच आज सकाळी देखील एक विमान युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्ली विमानतळावर दाखल झालं. पण रशियाकडून आज युद्धाची घोषणा करण्यात आल्यानंतर युक्रेनकडून हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशियाकडून सातत्यानं लढाऊ विमानांच्या घिरट्या युक्रेनवर सुरू आहेत. तसंच काही ठिकाणी बॉम्बहल्ले देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. यात आता भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या मोहिमेलाही ब्रेक लागला आहे.