नवी दिल्ली : पीएमओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे भासवून झेड प्लस सुरक्षा घेणाऱ्या गुजरातच्या महाठगाचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. महाठग किरण पटेल याच्याविरोधात आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाचा (पीएमओ) अधिकारी असल्याचे भासवून पटेलने अहमदाबादचे व्यापारी किशोर चंदराणा यांची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. त्याने चंदराणा यांना जम्मू आणि काश्मिरात मोठा प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
चंदराणा यांच्या तक्रारीमुळे पटेल याच्याविरोधात दाखल एकूण एफआयआरची संख्या आता सहा झाली आहे. त्याने चंदराणा यांना पुलवामातील देशस्तरीय वैद्यकीय परिषदेसाठी कराराचे आश्वासन दिले आणि त्या बदल्यात त्यांना ३.५ लाख रुपये खर्च करायला लावले.
पटेलने कसे गंडवले?आपण पटेलसाठी अहमदाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जी-२० च्या झेंड्याखाली एक कार्यक्रम आयोजित केला, तसेच त्याच्यासाठी अहमदाबाद ते श्रीनगरचे विमान तिकीट बुक करून पंचतारांकित हॉटेलात त्याच्या मुक्कामाची व्यवस्था केली, असे चंदराणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.