नितीन अग्रवालनवी दिल्ली : ‘एक देश एक रेशन कार्ड’ च्या आडून होत असलेली फसवणूक उघडकीस आली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी केलेल्या तक्रारीनंतर ग्राहक कामकाज खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली. हे दोघे रेशन कार्ड बनवण्याचे कंत्राट देण्याचे आश्वासन देऊन लोकांना लुबाडत होते.दानवे यांनी सांगितले की, एक देश एक रेशन कार्ड योजनेच्या नावावर नवी रेशनकार्डस छापण्याचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाने ही फसवणूक सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळत होती. महाराष्ट्रातील दोघांनी मला भेटून याची माहिती दिली होती. या दोघांनी सांगितले की, रांचीच्या पाच लोकांनी असे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रूपये उकळले. दानवे यांनी दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली व कठोर कारवाईचा आदेशही.दिल्लीचे उप पोलीस आयुक्त ईश सिंघल यांनी सांगितले की, तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन लबाडांना (दोघेही रा. रांची, झारखंड) कॅनॉट प्लेसमध्ये कॉफी हाऊसमधून अटक केली. त्यांच्या इतर तीन साथीदारांना पकडायचे आहे. पकडलेल्या दोघांकडील मंत्रालयाचे बनावट दस्तावेजही जप्त केले गेले. तक्रारदारांना नवे रेशनकार्ड बनवण्याचे कंत्राट देण्यासाठी या लोकांनी १५ लाख रूपये ठरवले होते. त्यातील मोठी रक्कम दिली गेली. परंतु, तक्रारदारांना संशय आल्यावर ते रांचीला येऊन पोलिसांकडे तक्रार केली.मंत्री दानवे यांनी सांगितले की, लोकांच्या सोयीसाठी ही ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आहे. लबाड लोकांनी ग्राहक कामकाज मंत्री रामविलास पासवान आणि रावसाहेब दानवे यांची नावे व बनावट सह्या करून काही कागदपत्रे तयार केली. याची माहिती दिल्ली पोलिसांना गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली होती.मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले की, एक देश एक रेशन कार्ड योजना सगळ््यात आधी महाराष्ट्र व गुजरातमध्ये यशस्वीपणे लागू केली गेली. त्यानंतर आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये तिचा विस्तार केला गेला. येत्या जूनपर्यंत ती २० राज्यांत लागू केली जाईल. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, दादरा नगर हवेली, गोवा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारखी राज्येही समाविष्ट होऊ शकतात. योजनेअंतर्गत आधारशी जोडलेल्या रेशनकार्डवर कोणत्याही रेशन दुकानातून रेशनघेता येईल.
रेशनकार्ड बनवण्याच्या कंत्राटाचे आमिष दाखवून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:32 AM