दगा! नोकरी देतो म्हणून सांगून रशियाला नेले; १२ भारतीयांना युक्रेनविरोधात युद्धाला जुंपले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:56 AM2024-02-22T11:56:22+5:302024-02-22T11:57:45+5:30
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यानी एजंटांनी ठकविलेल्या अशा १२ तरुणांना मायदेशात परत आणावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
एकीकडे इस्त्रायलने लाखो भारतीय मजुरांना दीड-दोन लाखांचा पगार देऊन युद्धग्रस्त भागात इमारती, रस्ते बांधणीसाठी नेलेले असताना तिकडे रशिया धोका करू लागला आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून रशिया भारतीय तरुणांना युक्रेन युद्धात लढण्यासाठी जुंपत असल्याचे समोर आले आहे.
युक्रेन सीमेवर अडकलेल्या तेलंगानाच्या एक आणि कर्नाटतच्या कलबुर्गीच्या तीन लोकांनी एसओएस मॅसेज पाठवून वाचविण्याची विनंती केली आहे. सैन्यात नोकरी देण्याच्या या बनावट रॅकेटपासून वाचविण्याची मागणी या तरुणांनी केली आहे.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यानी एजंटांनी ठकविलेल्या अशा १२ तरुणांना मायदेशात परत आणावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे सांगून त्यांना रशियाला नेण्यात आले आहे. तिथे त्यांना युक्रेनविरोधात जबरदस्तीने युद्ध लढण्यासाठी जुंपण्यात आले आहे.
तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद सुफियान याने त्याच्या कुटुंबाला एक व्हिडीओ पाठविला आहे. कृपया आम्हाला वाचवा. आम्ही हाय-टेक फसवणुकीला बळी पडले आहोत, असे त्याने यात म्हटले आहे. यात सुफियान रशियन सैन्याच्या वर्दीमध्ये दिसत आहे. सैन्य सुरक्षा सहाय्यक म्हणून काम असेल असे सांगून त्याला डिसेंबर 2023 मध्ये रशियाला पाठविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात त्याला युद्ध लढण्यास भाग पाडले जात आहे.