ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - एचआयव्ही - एड्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एड्स हेल्थ केअर फाउन्डेशनच्यावतीने (एएचएफ) मोफत कंडोम सुविधा सुरु करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार भारतात 2.1 मिलियन लोक एचआयव्ही - एड्स बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातीतील एचआयव्ही-एड्स बाधित रुग्णांचा आकडा पाहता इतर देशांच्या तुलनेत भारत तिस-या क्रमांकावर आहे. दरम्यान, हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लव्ह कंडोम, या नावाने मोफत कंडोम देण्याचा उपक्रम एड्स हेल्थ केअर फाउन्डेशन या संस्थेकडून बुधवारपासून सुरु करण्यात आला आहे.
या संस्थेकडून फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून कंडोमची ऑर्डर स्वीकारली जाईल आणि ती घरापर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येईल, असे एएचएफने म्हटले आहे. सार्वजनिक स्तरावर पहिल्यांदाच मोफत कंडोम देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्त प्रभाव असलेल्या भागात सरकारकडून मोफत कंडोम पुरवठा करण्यात आला. मात्र, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कंडोमच्या क्वालिटीबाबत काही तक्रारी आल्याचे दिसून आले.
रेल्वेस्टेशनवर सरकारकडून अल्प दरात व्हेंडिंग मशिन्सच्या माध्यमातून कंडोमची विक्री करण्यात आली. मात्र, त्या मशिन्सची तोडफोड करण्यात आली. खरं तर अशा व्हेंडिंग मशिन्स भारतात कधीच काम करु शकत नाहीत. लोक कंडोमसाठी पैसे देण्यास नकार देतात, असे या संस्थेचे व्ही सॅम प्रसाद यांनी सांगितले.