लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) या देशातील सर्वांत मोठ्या मुक्त विद्यापीठाने तृतीयपंथींच्या मोफत शिक्षणासाठी आपले दरवाजे उघडे केले आहेत. विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या सुमारे २०० अभ्यासक्रमांचे शुल्क तृतीयपंथीसाठी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.या प्रवेशांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसले तरी प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांना तृतीयपंथी अशी ओळख सिद्ध करण्यासाठी तशी नोंद असलेले आधार कार्ड किंवा कोणत्याही सरकारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र मात्र सादर करावे लागेल. या सवलतीचा तृतीयपंथींखेरीज अन्य कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी ओळखपत्राची ही अट घालण्यात आली आहे. विद्यार्थी नोंदणी विभागाच्या निबंधकांनी यासंबंधीची अधिसूचना २९ जून रोजी जारी केली.‘इग्नु’चे कुलगुरू प्रा. रवींद्र कुमार यांनी या फीमाफीची औपचारिक घोषणा रविवारी एका कार्यक्रमात केली व सुमारे १०० तृतीयपंथी व्यक्तींनी प्रवेशांसाठी लगेच अर्जही केले असल्याचे सांगितले.
इंदिरा गांधी विद्यापीठात तृतीयपंथींना मोफत शिक्षण
By admin | Published: July 05, 2017 1:12 AM