भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आयोगाकडून तीन पेट्रोल पंपावर बेधडक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात आचारसंहितांचे उलंघन केल्याप्रकरणी या तीन पेट्रोल पंपांना सील करण्यात आले असून त्यांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. या तीन पेट्रोल पंपावरुन भाजपा आणि समाजवादी पक्षाच्या गाड्यांमध्ये मोफत पेट्रोल भरण्यात येत होते, अशी माहिती आयोगाला मिळाली होती.
बालाघाट येथील दोन आणि भोपाळमधील एका पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी वीएल कंठा राव यांच्यामते, बालाघाटमध्ये सील करण्यात आलेले दोन पेट्रोल पंप बालाघाट विधानसभा क्षेत्रातील प्रचार अभियानात सहभागी असलेल्या दोन गाडींमध्ये मोफत पेट्रोल भरत होते. सध्या, बालाघाट विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार आणि मध्य प्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार अनुभा मुनजारे यांच्यात 'काँटे की टक्कर' अशील लढत आहे. गतवेळीच्या विधानसभा निवडणुकीत बिसेन यांनी अनुभा मुजारे यांचा साधारण 2500 मतांनी पराभव केला होता.
दरम्यान, मोफत पेट्रोल वाटप होत असल्याची माहिती मिळताच, निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्वॉड पथकाने तात्काळ याची सखोल माहिती घेतली. त्यामध्ये एक पेट्रोल पंप भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ होणाऱ्या प्रचारासाठी मोफत पेट्रोल पुरवित असल्याचे समोर आले. तर पथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तब्बल 245 लिटर पेट्रोलच्या विक्रीची कुठीलीही नोंद पेट्रोलपंप मालकांकडे नसल्याचे आढळून आले. त्यानंतर, पेट्रोल पंप मालकाविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या नेत्यासाठी प्रचार करणाऱ्या दुचाकींना मोफत पेट्रोल पुरविण्यात येत असल्याचंही आढळलं. त्यामुळे हे पेट्रोल पंप सील करण्यात आले असून त्याचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.