ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली आणि नोएडाला जोडणारा डीएनडी हा उड्डाणपूल आता वाहन चालकांसाठी टोलपासून मुक्त झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानं या उड्डाणपुलावरून जाणा-या वाहनांकडून टोलवसुली करू नका, असा आदेश दिला आहे. डीएनडी हा उड्डाणपूल दिल्लीतील यमुनेपासून नोएडातील पूर्व दिल्लीला जोडतो. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिल्ली-नोएडा भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुलावरून जाणा-या गाड्यांकडून 28 रुपये टोलवसुली करण्यात येत होती. तर दुचाकी चालकांकडून प्रतिप्रवास 12 रुपये वसूल करण्यात येते होते. आठवड्याभरात या पुलावरून 1,25,000 एवढ्या गाड्या जात होत्या.दरम्यान, खर्चाची पूर्ण रक्कम वसूल झाल्यानंतरही टोलवसुली सुरू ठेवणं चुकीचं असल्याचं कोर्टानं सुनावणीत म्हटलं होतं. 407 कोटींच्या खर्चाच्या बदल्यात 2200 कोटी रुपयांची टोलवसुली झाल्यानंतरही ती सुरू ठेवणं चुकीचं असल्याचं कोर्टाने सांगितलं. अलाहाबाद कोर्टाचा हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येणार असून, अनेक वर्षांपासून डीएनडी उड्डाणपुलावरून टोलमुक्त करणा-या नागरिकांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे.
दिल्ली-नोएडाला जोडणा-या डीएनडी उड्डाणपुलावरून करा मोफत प्रवास
By admin | Published: October 26, 2016 6:26 PM